नारायणगाव : ( प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात 100 कुस्त्या झाल्या. विजेत्या पैलवानाना सुमारे 15 लाख रुपयांचा इनाम वाटप करण्यात आला. नारायणगाव केसरी या मानाच्या किताबाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने जिंकली. पै. राक्षे यांनी दिल्लीचा पैलवान संतकुमार याला चित्तपट करून 2 लाख 51 हजार रुपयांचा इनाम जिंकला. आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, देवस्थान ट्रस्टचे योगेश पाटे, संतोष खैरे, एकनाथ शेटे,अशोक पाटे यांच्या हस्ते शिवराज राक्षे व पैलवान संतकुमार यांच्यात लावलेली अखेरची कुस्ती लक्षवेधी ठरली. राक्षे याने “लंके” डाव टाकून संतकुमार याला चितपट केले. सायंकाळी साडेपाच वाजता आखाड्याचे पूजन देवस्थानचे ट्रस्टचे पदाधिकारी योगेश पाटे, संतोष नाना खैरे, एकनाथ शेटे, अशोक पाटे यांच्या हस्ते करून आखाड्याला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपर्यंत प्रकाश झोतात आखाडा सुरू होता. लाल मातीचा आखाडा व प्रेक्षकांना बसण्यासाठी खास स्टेडियमची सुविधा करण्यात आले होती. आखाड्यात झालेल्या 90 टक्के कुस्त्या ह्या निकाली व चुरशीच्या झाल्या. कुस्त्यांना प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्या वाजवून साद दिली.यावेळीमाजी आमदार अतुल बेनके,देवदत्त निकम, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, शंकर पिंगळे, गणपत फुलवडे,भाजप नेत्या आशा बुचके,विघ्नहरचे देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. @ सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात पाचशे रुपये ते पंधरा हजार रुपये पर्यंत इनामाच्या सुमारे 70 कुस्त्या झाल्या. पै.साईराज नलवडे आणि पै. गणपत शेटे, पै. माऊली येलभर आणि पै. जर्मन, पै. सौरभ मराठे आणि पै. सौरभ शिंदे, पै. विवेक नायकल आणि पै. प्रकाश कार्ले यांच्यातील पंचवीस हजार रुपये इनामाच्या कुस्त्या निकाली झाल्या.पै. हनुमंत पुरी आणि पै. प्रदीप ठाकूर,पै. ओंकार येलभर आणि पै. ऋषी लांडे, पै. महेश फुलमाळी आणि पै. सौरभ काकडे यांच्यातील 51 हजार रुपये इनामाच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. पै. मंदार मेहेत्रे आणि पै. कोहली यांच्यात झालेली १ लाख ५१ हजार रुपये इनामाची कुस्ती मंदार मेहेत्रे याने जिंकली. दोन लाख रुपये इनामाच्या कुस्तीत पै. माऊली जमदाडे याने पै. महेंद्रकुमार याला चितपट केले. पै. शिवराज राक्षे आणि पै. संतकुमार यांच्यात२ लाख ५१ हजार रुपये इनामाची अखेरची कुस्ती झाली. दिल्ली, हरियाणा, पंजाब, अहिल्यानगर, कोल्हापूर, सासवड, कोकणठाण, मध्य प्रदेश यास पुणे जिल्ह्यातील नामांकित पैलवान आखाड्यासाठी उपस्थित होते. पंच म्हणून अनिल मेहेत्रे,अनिल गुंजाळ, एचपी नरसोडे यांनी काम पाहिले. इनाम वाटपाचे नियोजन दादाभाऊ खैरे,अक्षय वाव्हळ, विलास पाटे, राजाराम पाटे यांनी केले.
