पारगाव : ( किशोर खुडे )
प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्याने आता पारंपारिक तमाशाचेही स्वरूप बदलून गेले आहे. तमाशाचा प्राण असलेली वगनाट्ये आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आली आहेत.तमाशाला आता ऑर्केस्ट्राचे स्वरूप आले आहे. परंतू ही पारंपारिक लोककला जतन करण्यासाठी तमाशा फडमालकांची अक्षरक्षः तारेवरची कसरत सध्या सुरू आहे. तमाशा कलेला राजाश्रया प्रमाणेच, लोकाश्रय देखिल मिळणे गरजेचे आहे.असे मत तमाशा कलावंत नीलेश आहिरेकर यांनी व्यक्त केले.
वळती (ता.आंबेगाव )येथे मुक्तादेवी यात्रेनिमित्त करमणुकीसाठी नीलेश अहिरेकर सह रूपाली पुणेकर हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तमाशा फड मालक नीलेश आहिरेकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले “सध्या तमाशाला संपूर्णतः ऑर्केस्ट्राचे स्वरूप आले आहे. पूर्वीच्या काळी तमाशा ठरविताना यात्रा कमिटी किंवा ग्रामस्थ हे वगनाट्यांविषयी विचारणा करत होते.कलाकार कोणते आहेत? हे विचारून घ्यायचे. परंतू आता तमाशामध्ये तरुण मुलींची संख्या किती आहे? याची विचारणा होत आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडीचा परिणाम सध्या तमाशावर झालेला दिसून येत आहे.पूर्वीच्या काळी तमाशा होणाऱ्या वगनाट्यांमुळे समाजप्रबोधन व्हायचे . परंतू आता तमाशा मधील वगनाट्ये जवळपास संपल्यातच जमा आहेत.पारंपारिक गण – गौळण, विनोदी बतावणी प्रेक्षकांमुळे धावत्या स्वरूपात घ्यावी लागत आहे.त्याऐवजी नवीन हिंदी गाण्याची फर्माईश होत असते.पारंपारिक तमाशातील हलगी, ढोलकी, तुणतुणे या ऐवजी आता की – बोर्ड, ॲक्टो पॅड, ड्रमसेट सारखी वाद्ये दिसू लागली आहेत . प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडीमुळे तमाशाचे स्वरूप बदलले आहे.शासनाकडून देखील वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे.तमाशा फडमालकांचे पॅकेज, अनेक तमाशा कलावंतांना मानधनच मिळत नाही.शासनाने तमाशाच्या वाहनांना टोल माफ करणे गरजेचे आहे. ” आहिरेकरांचा तमाशा आगळावेगळाच – : मूळचा सातारा जिल्ह्यातील निलेश आहिरेकर सह रूपाली पुणेकर हा तमाशा आहे. आहिरेकर कुटुंबातील एकूण बारा माणसे या तमाशा फडात काम करतात.नामवंत ढोलकी पट्टू प्रकाश अहिरेकर, बानू आहिरेकर यांच्या कुटुंबातील एकाही कलाकाराला काडीचेही व्यसन नाही.यामध्ये किशोर आहिरेकर,निलेश आहिरेकर हे पदवीधर आहेत. तर ओंकार आहिरेकर हे नामवंत कीर्तनकार आहेत. तमाशा मंडळाकडून वळती गावचे कौतुक – :राज्य शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचा विशेष शांतता पुरस्कार मिळालेले वळती गाव हे शांतता प्रिय गाव आहे. हे गाव कलावंतांना प्रोत्साहन देणारे गाव आहे. संपूर्ण तमाशा प्रेक्षकांनी शांततेत पाहिला. असे कौतूक जेष्ठ तमाशा कलावंत प्रकाश आहिरेकर यांनी केले.
