जुन्नर बाजार समितीसाठी 28 कोटी 44 लाख रुपये खर्च करून नवीन जमीन खरेदी करण्यास माऊली खंडागळे व संतोष चव्हाण या दोन संचालकांचा तीव्र विरोध.

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये सहा एकर जागेत तरकारी टोमॅटो धना मार्केट सुरू असून पुणे नाशिक महामार्ग लगत मारुती शोरूम शेजारी 13 एकर जागा गेल्या काही वर्षांपासून पडून असताना पुन्हा 28 कोटी 44 लाख रुपये खर्च करून वळणवाडी येथील एवढ्या महागाची दहा एकर जागा बाजार समितीने खरेदी करू नये अशी मागणी बाजार समितीचे माऊली खंडागळे व संतोष चव्हाण या दोन संचालकांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे लेखी निवेदन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा नेत्या आशाताई बुचके यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे नाशिक महामार्ग लगत मारुती शोरूम शेजारी 13 एकर जागा गेल्या अनेक वर्षापासून तशीच पडीक पडून आहे. त्या ठिकाणी बाजार समितीने अद्याप शेतकरी हिताचा कोणताही उपक्रम सुरू केला नाही. त्या जागेचा कोणताच उपयोग न करता पुन्हा दहा एकर जागेची गरज काय?असा सवाल या दोन संचालकांनी व्यक्त केला असून बाजार समितीने ही जागा खरेदी करू नये व बाजार समितीला ही जागा खरेदी करण्यास या नेते मंडळींनी विरोध करावा अशी मागणी या दोन संचालकांनी निवेदनात केली आहे केली आहे. दरम्यान या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,नवीन संचालक मंडळ दोन वर्षापासून अस्तित्वात आले असून या संचालक मंडळांनी शेतकरी हिताचा कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही. शेतकरी अपघात विमा,स्वस्तात शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जेवणाची सुविधा अशा उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी करून सुद्धा हे विषय मार्गी लागत नसल्याची खंत या दोघांनी व्यक्त केली आहे. शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला आणल्यावर त्यांना पट्टी दिली जावी ही गेले अनेक दिवसाची मागणी देखील बाजार समितीकडून मार्गी लागत नसल्याचे यांचे म्हणणे आहे. ओतूर, आळेफाटा, जुन्नर व बेल्हे या ठिकाणी जागेची गरज असताना त्या ठिकाणी जागा खरेदी केली जात नाही परंतु वळणवाडीच्या जागेमध्ये कोणाच्यातरी व्यक्तिगत फायदा असल्यामुळे ही जागा खरेदी करण्याचा घाट घातला जात असल्याचा या दोघांचा आरोप आहे. बाजार समितीच्या पैशाचा अशा प्रकारे जमीन घेण्यासाठी दुरुपयोग होऊ नये यात आपण नेतेमंडळींनी शेतकरी हितासाठी लक्ष घालावे अशी मागणी मागणी खंडागळे व संतोष चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात बाजार समितीचे सभापती संजय काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, येत्या 23 एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या मासिक सभेच्या अजेंड्यावर जागा खरेदी करण्याचा विषय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाची बैठक झाल्यावर याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? हे मी विस्ताराने सांगणार आहे सध्या या विषयावर मी अधिक काही बोलणार नसल्याचे सांगितले .

जाहिरात

error: Content is protected !!