नारायणगाव (प्रतिनिधी) पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे शिवसेना पक्षामध्ये नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. तालुक्यात काम करताना आपल्याला “फ्रीडम” मिळत नाही अशी त्यांची तक्रार असल्याचे समजते.
शिवसेना पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारायणगाव या ठिकाणी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला होता. लांडे यांच्या भाषणातील “खुशीखुशी” हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आवडला होता.
दरम्यान आजवर देवराम लांडे कोणत्याही एका राजकीय पक्षांमध्ये फार काळ राहिलेले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा आजवरचा त्यांचा प्रवास राहिला आहे.विशेष म्हणजेदेवराम लांडे हे सत्ताधारी पक्ष सोबत नेहमीच असतात.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता एका ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे देवराम लांडे नाराज झाले असल्याची चर्चा होत आहे. या कार्यक्रमांमध्ये देवराम लांडे यांना बोलू द्यायला हवेच होते, अशी देखील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. देवराम लांडे हे आदिवासी भागातील एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांची नाराजी शिवसेना पक्षाला परवडणारी नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये देवराम लांडे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. किंबहुना लांडे यांच्यामुळेच शरद सोनवणे आमदार झाले.
देवराम लांडे यांची शिवसेना पक्षामध्ये अशीच घुसमट राहिली तर याचा परिणाम पक्षावर निश्चित होईलच शिवाय पक्षातील काही कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याची देखील दाट शक्यता आहे. आदिवासी भागातील याच पक्षाचा एक युवा नेता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
