मढ (प्रतिनिधी)
जुन्नर तालुक्यातील वाटखळ व पांगरी परिसरामध्ये रविवारी (दि. 13) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने सुमारे अडीचशेहुन अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांची आहे.
दरम्यान शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्यामुळे या विभागाचे खासदार अमोल कोल्हे,आमदार शरद सोनवणे व भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जावी अशी मागणी केली आहे.
या भागातील शेतकऱ्यांची टोमॅटो कांदा,आंबे त्याचबरोबर पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांची पत्रे उडून गेले आहेत. तातडी या सगळ्यांचे पंचनामे करावेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अर्थसहाय्य करावे अशी मागणी भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून केली आहे.
दरम्यान या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे गारपिटीने नुकसान झाले आहे,त्या शेतकऱ्यांना आता त्या शेतात वर्षभर दुसरे कुठलेच पीक घेता येणार नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं “अर्थ’कारण पूर्णपणे कोलमडलेला आहे.दरम्यान या भागातील एका अपंग कुटुंबाच्या घराशेजारी चिंचेचे झाड असून ते झाड तातडीने हटवावे अशी मागणी या वृद्ध महिलेची आणि अपंग मुलीची आहे तथापि संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काल झालेल्या पावसामुळे हे कुटुंब अतिशय भयभीत झाले होते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
