जुन्नर तालुक्यातील आदिवासी जनतेचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात शासन कटीबद्ध – अशोक उईके

WhatsApp

नारायणगाव : राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे शुक्रवारी (दि. 11) जुन्नर तालुक्यात दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहामध्ये विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्रिमहोदयांनी भारतीय जनता पक्षाच्या जुन्नरच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या समवेत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे होते. भाजपा नेत्या आशाताई बुचके व भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांनी मंत्री अशोक उईके व आमदार शरद सोनवणे यांचे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आशाताई बुचके यांनी मंत्री उईके यांना जुन्नर तालुक्यातीलआदिवासी जनतेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनामध्ये बुचके यांनी म्हटले आहे की,खिरेश्वर ते लव्हाळी मधील तोलार खिंड फोडून रस्ता करणे गरजेचे आहे. हा रस्ता पुणे, नगर, व ठाणे या जिल्ह्यांना जोडणारा असून हरिश्चंद्रगड येथे जाण्यासाठी जवळचा असल्याने पर्यटन तसेच श्रीक्षेत्र हरिश्चंद्रगड येथे दर्शनात येणाऱ्या भाविकांना सोयीचा होणार आहे. तसेच जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रामध्ये बुडीत बंधारे बांधणे गरजेचे आहे. सध्या धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे बुडीत बंधारे तात्काळ बांधण्याची मंजुरी दिली जावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आंबोली येथील दाऱ्या घाट देखील फोडणे गरजेचे असून हा घाट फोडल्यानंतर जुन्नर ते मुंबई अंतर कमी होणार आहे त्यामुळे हा घाट फोडण्यासाठी निधी दिला जावा असे या निवेदनात म्हटले आहे. कुकडेश्वर व नागेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे गरजेचे असून यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी भागात विकास सोसायटी असून या संस्थांसाठी स्वतंत्र कार्यालय बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. बुचकेवाडी ते खेतेपठार हा रस्ता खराब झाला असून या रस्त्याने भीमाशंकरला जाणे सोयीचे असते त्यामुळे या रस्त्यासाठी आदिवासी विभागामार्फत रस्त्याला निधी मिळावा. तसेच सुराळे येथे मीना नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या एक बंधारा बांधल्यास या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटू शकतो त्यामुळे यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आशाताई बुचके यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की, आशाताई बुचके यांनी दिलेल्या निवेदना संदर्भात शासन योग्य तो निर्णय घेईल. राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून ही सगळी काम मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन असे यावेळी त्यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!