नारायणगाव :
लग्नातील मानपान चांगला केला नाही तसेच जमीन खरेदीचे २८ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वृषाली देवेंद्र मुळे (वय ३०, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर, सध्या रा. आपटाळे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवेंद सुरेश मुळे, मंजुळा सुरेश मुळे, प्रविण सुरेश मुळे आणि सुरेश कुशाबा मुळे (सर्व रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, जून २०२१ ते ६ जून २०२६ या कालावधीत मांजरवाडी तसेच विंचबे (ता. पनवेल, जि. रायगड) आणि वापी (गुजरात) येथे आरोपींनी वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘तू दिसायला चांगली नाहीस’, तसेच लग्नात माहेरच्यांनी चांगला मानपान केला नाही, असे बोलून त्रास देण्यात आला. तसेच जमीन खरेदीसाठी घेतलेले २८ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धोंड्याच्या महिन्यातही चांगला मानपान केला नाही, असे म्हणून छळ केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुरकुले (ब. नं. २२६५) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार बोकड (ब. नं. १६९७) यांनी केले.