नारायणगाव : ( प्रतिनिधी) जुन्नर आणि शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या दहशतीला काही प्रमाणात विराम मिळाला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात वनविभागाने राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला गोळी घालून ठार करण्यात यश आले. या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी परिसरामध्ये अधिक संख्येने बिबट्या असून कोणत्याही क्षणी मानवावर हल्ला होऊ शकतो ही भीती जनतेच्या मनात कायम आहे.
गेल्या दीड महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी होत असताना, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विनंतीनंतर सरकारकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून मोहिम राबवली आणि पिंपरखेड परिसरात त्या नर बिबट्याला ठार करण्यात आलं. दरम्यान कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून पुणे नाशिक महामार्गावर तब्बल सोळा तास आंदोलन केले.
ही घटना दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव–शिरूर मतदारसंघात घडली असून, गेल्या दहा वर्षांत प्रथमच अशा प्रकारे बिबट्याला ठार मारण्याची कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या या मोहिमेत स्थानिक पथकासोबत तज्ज्ञ शूटरचाही सहभाग होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत वनविभागाने एकूण दहा बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. या सलग कारवायांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात उपवनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या की, “गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी सतत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या हिमतीने मोहिम पार पाडली. नागरिकांचा जीवितहानीचा धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस विभाग परिसरात गस्त आणि शोधमोहीम सुरू ठेवणार आहे.”
बिबट्याला ठार मारल्यानंतर वनविभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांचे आभार मानत या कारवाईचे स्वागत केले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. गेल्या २३ वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं, पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून समाधान वाटतंय. या कामगिरीबद्दल वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. गेल्या काही दिवसात या बिबट्यामुळे आपण आपल्या जिवाभावाची जी माणसं गमावली त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो!” – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील