नारायणगाव : विघ्नहर टाइम्स
चालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी लागल्याने ॲमेझॉन कंपनीचा माल वाहतूक करणारा कंटेनर पुणे–नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यालगत सुमारे पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून कंटेनर व त्यामधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक राकेश कुमार (वय ४५, रा. दिल्ली) हे ॲमेझॉन कंपनीचा माल घेऊन नाशिकहून पुण्याच्या दिशेने कंटेनर चालवत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना झोप अनावर झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कंटेनर महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी दोन क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून कंटेनर आणि त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी महामार्गावर वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनचालकांनी विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान पुरेशी विश्रांती घेऊन वाहन चालवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.