कोपरे-मांडवे परिसरात भातपीक करपले; आदिवासी शेतकरी आर्थिक संकटाततातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

WhatsApp


नारायणगाव :
जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसरात पावसाअभावी भाताची पिके पूर्णपणे करपून गेली असून, आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू ठोंगीरे यांनी केली आहे.
कोपरे, मांडवे, मुथाळणे, पुताचीवाडी, जोशीचीवाडी, काठेवाडी आणि जांभूळशी या भागांत ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने भातशेती वाया गेली आहे. खाचरांमधील पाणी आटले असून, मांडवी नदीतही पाण्याऐवजी केवळ डबकी दिसत आहेत.
या आदिवासी भागातील भात हे प्रमुख पीक आहे. काही शेतकरी रब्बी हंगामात वाटाणा व फरशीची लागवडही करतात.परंतु यंदा पाऊस नसल्याने रब्बी हंगामातील ओके वाळून गेल्याने अधिकचे संकट ओढवले आहे. दरम्यान परिसरात रोजगाराच्या संधी कमी असल्याने महिलांना पहाटे घरातील कामे उरकून दिवस उगताच बनकर फाट्यावर मजुरीसाठी जावे लागते. दिवसभर काम करून परतल्यानंतर पुन्हा घरची जबाबदारी सांभाळावी लागते.
पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता आहे. सध्या डोंगरावर उपलब्ध असलेला चारा जेमतेम आठ ते पंधरा दिवस पुरेल. त्यानंतर जनावरांना चारा उपलब्ध करणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर सुरू करण्याचे तसेच चारा छावण्यांचे नियोजन करावे. याशिवाय, खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.
ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राजू ठोंगीरे यांनी केली आहे. या भागातील रस्ते खराब झाल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. तसेच एसटी सुद्धा अनेक वेळा रस्त्याला खड्डे असल्यामुळे बंद पडलेली आहे. रस्ते खराब असल्यामुळे श्री महामंडळाकडून जुन्या बसेस इकडे पाठवल्या जातात त्या बसेस अनेक वेळा रस्त्यातच बंद पडत असतात त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होत असते.

जाहिरात

error: Content is protected !!