नारायणगाव : (प्रतिनिधी) तुमच्या गाडीतून आम्हाला सोडा. आम्हांला लिफ्ट द्या एक हजार रुपये भाडे देतो असे म्हणत गाडी काही अंतरावर गेल्यावर गाडी थांबवायला सांगून गाडीत बसलेल्या दोघांनी गाडी चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन व खिशातील पंधरा हजार रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना गुरवार( दि.12) रात्री साडे सात ते आठच्या सुमारास ओतूर बस स्थानक ते डुंबरवाडी टोलनाका दरम्यान घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव भाग्येश कुंडलिक वाघमारे (रा . नेतवड ता. जुन्नर ) असे आहे. या बाबत समजलेली माहिती अशी की,ओतूर एका खाजगी फर्ममध्ये भाग्येश वाघमारे कामाला आहेत. गुरुवारी कामावरून सुटल्यावर ते ओतूर बस स्थानका जवळ आल्यावर त्यांना एक युवक भेटला. व म्हणाला आम्ही तिघे मित्र आहेत. आम्हांला इकडची माहिती नाही. आमच्यकडे बॅगा आहेत. खामुंडी गावात तुमच्या गाडीतून सोडा एक हजार रुपये भाडे देतो. त्यांची गरज ओळखून व भाडे मिळते म्हणून वाघमारे त्या तिघांना सोडायला तयार झाले.दोघे गाडीत बसले. तिसरा कुठे आहे? असे वाघमारे यांनी विचारले असता तो बॅगा घेऊन दुसऱ्या गाडीत पुढे गेला असे सांगतिले. दरम्यान गाडी अर्धा किमी अंतरावर गेल्यावर गाडीतील एक जण म्हणाला मला लगवी लागली आहे. गाडी थांववून साईडला घ्या. गाडी थांबल्यावर गाडीत बसलेला इसम वाघमारे यांना म्हणाला खिशातील सगळे पैसे दे व गळ्यातील सोन्याची साखळी दे असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. खाली उतरल्या दुसऱ्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली. व वाघमारे यांना गाडीतून खाली ओढले. व दोघांनी लाथा बुक्क्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. गुप्त जागेवर दोन जोरात लाथा मारल्या व खिशातील पंधरा हजार रुपये व गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी घेऊन त्या दोघांनी पोबारा केला. हा प्रकार नगर कल्याण महामार्गवर किगा आईस्क्रीम दुकाजवळ घडला असून रस्त्याने ये जा करणारे लोक पाहत होते परंतु कोणीही त्या ठिकाणी थांबले नाही. अखेर वाघमारे यांनी आपल्या मुलाला फोन करून बोलून घेतले. मुलांनी वडीलाला गाडीत बसून ओतूरच्या एका खाजगी रुग्णाला दाखल केले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे उपचार करणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान याबाबतची खबर भाग्येश वाघमारे यांनी ओतूर पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी अज्ञात दोघांच्या विरोधात दाखल केली आहे. पोलीसांनी दवाखान्यात जाऊन वाघमारे यांचा जबाब नोंदविला आहे.