आदिवासी मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले म्हणून आमदार शरद सोनवणे आदिवासी जनतेची माफी मागा. निवासस्थानसमोर आदिवासी युवकांचा आक्रोश.

नारायणगाव : (प्रतिनिधी) आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या बद्दल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अपशब्द वापरल्याने आदिवासी समाजाचा अपमान झाला या उद्देशाने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या युवकांनी आमदार सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. ” माफी मागा माफी मागा शरद सोनवणे माफी मागा ” अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या रायगड बंगल्यासमोर चोख पोलीसांचा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. त्यामुळे वातावरण निवळले.

जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी जुन्नर या ठिकाणी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बोलवलेल्या बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी युवकांनी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांच्या चाळकवाडी येथील निवासस्थानासमोर रविवार (दि. 27) आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांचा उद्रेक अधिक तीव्र होता. आदिवासी विकास मंत्री यांचा एकेरी शब्दप्रयोग करून त्यांना चोर संबोधल्याने आदिवासी तरुणांमध्ये तीव्र रोष होता. या युवकांनी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते आमदार शरद सोनवणे यांच्या रायगड बंगल्यात घुसू नये म्हणून पोलिसांनी गेटचा दरवाजा लावून सगळे पोलीस कडे करून उभे होते. संविधानिक पदावर असलेल्या मंत्री अशोक उईके यांच्या बद्दल अपशब्द वापरण्याचा आमदार शरद सोनवणे यांना अधिकार नाही. त्यांनी आदिवासी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना चोर संबोधल्याने आमच्या आदिवासी समाजाचा घोर अपमान झाला आहे त्यामुळे सोनवणे यांनी आदिवासी समाजाची आणि आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. या आंदोलनात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक गभाले ,अरुण काठे,निलेश साबळे,प्रविण पारधी,योगेश चपटे,शिवाजी चौरे,अरुण केदार,सोमनाथ मुकणे,नामदेव साबळे आदींचा समावेश होता. यावेळी आमदार शरद सोनवणे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज करीत असताना बाहेर कशाचा आवाज येतोय म्हणून बाहेर येऊन आंदोलन कर्त्यांना सामोरे गेले. यावेळी सुरुवातीला आमदार शरद सोनवणे व आदिवासी कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मला आदिवासी समाजाबद्दल मोठी आस्था आहे. त्यांच्या समस्या, त्यांचे दुःख मी जाणतो. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा नेहमी पुढाकार असतो. तथापि घोडेगाव येथे असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याकडून आदिवासी जनतेवर नेहमीच अन्याय होतोय या संदर्भामध्ये आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. आपण जरी मंत्री असलो तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर आपलं मंत्रिपद काय कामाचं? आणि म्हणून ह्या उद्रेकात माझ्याकडून मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले गेले. ते व्यक्तिगत माझे मित्र आहेत काही महिन्यांपूर्वी त्यांना मी जुन्नरला आणले होते. परंतु आदिवासी जनतेवर अन्याय करण्याऱ्या अधिकाऱ्याला त्यांनी पाठीशी घातले त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा राग आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी त्यांची माफी मागून जुन्नर आंबेगाव, खेड व मावळ या तालुक्यात आदिवासी जनतेवर प्रदीप देसाई हे अधिकारी कसा अन्याय करतात व मंत्री देखील त्यांना कसे पाठीशी घालतात हे मी मुख्यमंत्र्यांना पटवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तुमचा मंत्री व संबंधित अधिकारी यांच्या बद्दल असलेला रोष व त्यांच्याकडून होत नसलेली कामे याबाबत तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता परंतु संविधानिक पदावर असलेल्या मंत्री महोदयांबद्दल तुम्ही जाहीर रित्या अशा प्रकारचे अपशब्द वापरू शकत नाही तुम्ही अगोदर त्यांची माफी मागा असा आग्रह त्या कार्यकर्त्यांनी धरल्याने अखेर आमदार शरद सोनवणे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. दरम्यान त्यानंतर संबंधित कार्यकर्ते व आमदार शरद सोनवणे यांची एकत्रित बैठक होऊन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदिवासी जनतेवर कशाप्रकारे अन्याय करतात हे आमदार सोनवणे यांनी कागदपत्राचे आधारे या कार्यकर्त्यांना दाखवून दिले. त्यानंतर आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणाले की, संबंधित अधिकारी आदिवासी जनतेवर अन्याय करीत असेल आणि मंत्री जर त्यांना पाठीशी घालत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येऊन अथवा स्वतंत्र मंत्री महोदयांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास भाग पाडू. आमदार सोनवणे यांचा आदिवासी जनतेला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. भविष्यकाळात देखील आदिवासी जनतेला त्यांचे असेच सहकार्य राहील अशी यावेळी या कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

जाहिरात

error: Content is protected !!